उसतोड मजुराला डांबून ठेवून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 04:11 PM2019-11-03T16:11:30+5:302019-11-03T16:12:10+5:30
उचल घेऊन कामावर न आल्याचे कारण पुढे करत उसताेड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वाकड येथे घडली.
पिंपरी : उचल घेऊनही कामावर न आल्याने उसतोड मजुराला डांबून ठेवले. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. दि. १९ ते २७ सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, याप्रकरणी कुमार बसप्पा कांबळे (वय ३२, रा. कस्पटे वस्ती, वाकड, मुळगाव उमराणी, ता. जत, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयाप्पा गोफणे, नवनाथ सिद्धू गोफणे, ओघ्याप्पा गोफणे, शिवा माने, गुडा माने, बापू भिसे, दत्तात्रय देवमणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कांबळे उसतोड मजूर आहेत. त्यांनी उसतोडणीसाठी काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. त्यानंतर ते वाकड येथे आले. मुकादम असलेला आरोपी याने आपल्या साथीदारांसह वाकड येथे येऊन बेकायदेशीर जमाव केला. तसेच फिर्यादी कांबळे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी कांबळे यांना व त्यांच्या पत्नी, मुलाबाळांना तसेच जोडीदार नानाप्पा सुखदेव सोवळसंग याला गाडीमध्ये बसवून कर्नाटक येथील त्यांच्या मूळगावी घेऊन गेले. तेथे एका बंद खोलीत डांबून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी कांबळे व त्यांच्या जोडीदाराला तेथून गाडीने कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे घेऊन गेले. तेथे एका स्टॅम्प पेपरवर ५० हजार रुपयांऐवजी एक लाख ८० हजार रुपयांची उचल फिर्यादी कांबळे यांनी घेतल्याचे आरोपींनी लिहून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.