अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:59 AM2018-06-01T06:59:30+5:302018-06-01T06:59:30+5:30
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या पथकावर दगडफेकीचाही प्रयत्न करण्यात आला
रहाटणी : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या पथकावर दगडफेकीचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कारवाई न करताच माघारी फिरण्याची नामुष्की महापालिकेच्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ओढवली. रहाटणी येथील नखाते वस्तीतील गणराज कॉलनीमधील विकास आराखडा (डीपी) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान हा प्रकार घडला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार होती; मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यामुळे ही कारवाई स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
विकास आराखड्यानुसार गणराज कॉलनीत १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण आहे. या रस्त्यावर अनेक घरे आहेत. ही घरे स्वत:हून काढून घ्यावीत यासाठी महापालिका प्रशासनाने २४ मे रोजी त्यांना नोटीस दिली आहे. काही नागरिकांनी नोटीस घेतली नाही. त्या दिवशीसुद्धा रहिवाशांनी विरोध केल्याने काही नोटिशी महापालिका अधिकारी परत घेऊन गेले. त्यानंतर गुरुवारी सकाळी कारवाईच्या तयारीनिशी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी येथे दाखल झाले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत कारवाईला विरोध केला. कारवाईसाठी आलेल्या पथकावर या संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना या नागरिकांना लागलीच येथून हलविले. त्यामुळे दगडफेक टळली. काही नागरिकांनी आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील १२ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. रहाटणीतील नखाते चौक ते छत्रपती संभाजी महाराज उद्यानाला जोडणारा हा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्यामुळे या भागात १९८५पासून पन्नासहून अधिक घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा या रस्त्याला विरोध आहे. १२ मीटरऐवजी हा रस्ता ९ मीटर करावा, अशी मागणी या नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आयुक्त हर्डीकर रजेवर गेले असताना महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या काही दिवसांपासूनबांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नखातेवस्ती, रहाटणी येथील अनधिकृत बांधकामधारकांना कारवाई करण्याअगोदर २४ तासापूर्वीची नोटीस देण्यात आली नाही, असा आरोप काही नागरिकांनी केला. नोटीस न देता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गुरुवारी सकाळी कारवाईसाठी आले. नोटीस न देता कारवाई करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.