स्थायी अध्यक्षपदी सीमा सावळे बिनविरोध
By admin | Published: April 1, 2017 02:10 AM2017-04-01T02:10:19+5:302017-04-01T02:10:19+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका सीमा सावळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका सीमा सावळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. सावळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सावळे या स्थायी समितीच्या ३३व्या अध्यक्षा आहेत. तसेच, त्या भारतीय जनता पक्षाच्या व शहरातील पहिल्या मागासवर्गीय महिला अध्यक्षा ठरल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकमुखी सत्ता असल्याने महापौर, उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. महापौरपद भोसरीचे आमदार महेश लांडगेसमर्थकांना दिल्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा होती. या जागेवर आमदार जगतापसमर्थक सीमा सावळे यांची वर्णी लागणार, याबाबत पहिले वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्ष असून, पुरेशा संख्याबळाअभावी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच सावळे यांचा एकमेव अर्ज होता.
त्या महापालिका स्थायी समितीच्या पहिल्याच मागासवर्गीय महिला अध्यक्षा आहेत. निवडीनंतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, शंकर जगताप, नगरसेविका आशा शेंडगे, भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, विरोधी पक्ष नेते योगेश बहल उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अध्यक्षांनी नाकारले वाहन
पिंपरी : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शासकीय वाहन नाकारले असून त्यापाठोपाठ स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनीही महापालिकेचे वाहन नाकारले आहे. पारदर्शक कारभारावर पालिकेतील नवीन सत्ताधाऱ्यांनी भर दिला आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर सावळे यांनी पालिकेचे वाहन वापरणार नाही, असे सांगितले.
करदाता हा महापालिकेचा खरा मालक आहे. स्थायी समिती सभेत खर्चाला मंजुरी देताना या करदात्या नागरिकांशी प्रामाणिक राहण्याचा आपला प्रयत्न असेल. उधळपट्टीला लगाम लावण्याबरोबरच आर्थिक शिस्त लावून उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. त्याची सुरुवात मी स्वत:पासूनच करणार असून, महापालिकेचे वाहन वापरणार नाही. त्यामुळे वार्षिक सुमारे दहा ते बारा लाख रुपयांची बचत होईल आणि या पैशांचा वापर करदात्यांना सुविधा पुरविण्यासाठी केला जाईल.
- सीमा सावळे
नवनिर्वाचित अध्यक्ष, स्थायी समिती