स्थायी समिती सदस्य : पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:11 AM2018-05-10T03:11:37+5:302018-05-10T03:11:37+5:30
लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.
पिंपरी : लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे, खडकीच्या सीमेवर बोपखेल हे गाव आहे. या गावाच्या तिन्ही बाजूंनी लष्कराची हद्द आहे. पूर्वी या गावात जाण्यासाठी दापोडीतील सीएमई हद्दीतून जावे लागत होते. मात्र, संरक्षणाच्या मुद्द्यावरून या जागेतून जाण्यास लष्कराने मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांना वळसा घालावा लागत होता. दोन वर्षांपूर्वीच मंजूर सीएमई हद्दीतून परवानगी नाकारण्यात आल्याने बोपखेल ते खडकी असा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात ४२ कोटी खर्चून पूल उभारण्याचा विषय मंजूरही केला होता. त्यानंतर पूल उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. डिफेन्स इस्टेट आॅफिस पुणे सर्कलने महापालिकेला पत्रही पाठविले आहे.
महापालिकेने पुलाची जागा हस्तांतरणासाठी मागितल्यानंतर आणि पूल उभारण्यास संमती मिळाल्यानंतर जागेचा मोबदला मिळावा यासाठी डिफेन्स इस्टेट पुणे सर्कल विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले. साधारणपणे २३ हजार ८४२ चौरस मीटर जागा अपेक्षित असून, त्यासाठी २२ कोटी २४ लाखांची मागणी डिफेन्स इस्टेटने केली आहे. हे पत्र ३० जानेवारीला पाठविले असून पीडीडीईच्या २१ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ त्यावर दिला आहे. हे पत्र मिळून पाच महिने झाले. जागेची रक्कम कमी करण्यासंदर्भात महापालिकेने ३० जानेवारीला पुन्हा संरक्षण खात्यास पत्र दिले आहे. प्रशासनाचा पुलाला खोडा असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. यावर आजच्या स्थायी समितीत चर्चा झाली.
बोपखेलवासीयांचा मोठा प्रश्न असताना प्रशासन असंवेदनशील आहे. तातडीचे असा उल्लेख पत्रावर असताना महिन्यापूर्वी पत्र येऊनही उत्तर दिले गेले नाही. डेअरी फार्मबाबत जेवढी संवेदनशीलता दाखविली तेवढी बोपखेलबद्दल दाखविली नाही, नगरसेवक विकास डोळस यांनी नाराजी व्यक्त केली.
२५ कोटींचा द्यावा लागणार मोबदला
४पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण खात्याने २५ कोटीचा मोबदला मागितला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ऐनवेळी स्थायीसमोर ठेवण्यात ठेवला होता. त्यास मंजुरी दिली आहे, असे विलास मडिगेरी यांनी सांगितले. बोपखेलचा पूल लवकरात लवकर होण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकर हालचाली करणे गरजेचे आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव महासभेकडे पाठविला आहे. त्यामुळे बोपखेलचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, बोपखेलकरांची त्रासापासून मुक्तता होणार आहे, असे चेतन घुले यांनी सांगितले.