पिंपरी-चिंचवड पालिकेतील स्थायीच्या सभेत ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:20 PM2017-12-15T14:20:57+5:302017-12-15T14:23:52+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ऐनवेळेसचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. सल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) मंजूर करण्यात आले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ऐनवेळेसचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. सल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) मंजूर करण्यात आले.
स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळी प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. स्थायी समितीत सर्वाधिक सव्वाचारशे कोटींची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. त्यात काही ऐनवेळेसचे विषयही होते. त्यात सल्लागारांचे ऐनवळेसचे विषय समितीने मंजूर केले आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकास योजना हद्दीतील सीडी वर्क पासून ते वाल्हेकरवाडी चौकापर्यंत ३४.५० मीटर रस्ता विकास करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच सुदर्शननगर चौक येथे एफओबी बांधणे तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमान या रस्त्याचे उर्वरित काम करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या विकास आराखड्यातील मोशी येथे स्टेडीयमचे आरक्षण आहे. ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदापूर्व आणि व्यवस्थापन तज्ज्ञ नेमण्यात येणार आहे. त्यासाठीच्या ऐनवेळसच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पिंपळे सौदागर मधील आरक्षण क्रमांक ३६२ येथे खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर करण्यात आला.
पाण्याबाबत सत्ताधारी-विरोधक समाधानी
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले होते. लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढू? असा इशारा विरोधी पक्षातील सदस्यांनी दिला होता. पाणीपुरवठा विभागातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या सभेत विरोधकांनी पाण्यावर बोलायचे आहे, असे म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांचे कान टवकारले. शरद मिसाळ, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, अमित गावडे यांनी ह्यगेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरूळीत झाल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. अशीच परिस्थिती यापुढेही कायम रहावी, याची दक्षता पाणीपुरवठा विभागाने घ्यावी, अशी मागणी केली.