तुटलेल्या पुलाचे काम सुरू करा
By admin | Published: October 15, 2016 05:44 AM2016-10-15T05:44:18+5:302016-10-15T05:44:18+5:30
साळवाडी येथील तुटलेल्या पुलाचे काम दहा दिवसांत सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धोंडिबा भोर
राजुरी : साळवाडी येथील तुटलेल्या पुलाचे काम दहा दिवसांत सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धोंडिबा भोर यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की साळवाडी व बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला तडे जाऊन काही भाग सुमारे दोन महिन्यांपूर्वी कोसळला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण बंद केलेली आहे. शिवाय या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये निधी मंजूर झाला असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
हा पूल बंद असल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावांचा नारायणगाव, तसेच बेल्हा या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतातील माल बाहेरगावी विकण्यासाठी या पुलाचा वापर ने-आण करण्यासाठी करीत असत; परंतु पूल बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यास नेण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांना सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरून ये-जा करावी लागत आहे.
शिवाय साळवाडी गावाचा बोरी बुद्रुक या गावाशी दररोज संपर्क असायचा. येथील ग्रामस्थ बोरी गावात सोसायटी दवाखाना, वीज मंडळाचे कार्यालय, पोस्ट आॅफिस, साखर कारखाना आॅफिस यांच्याशी संपर्क तुटला आहे. (वार्ताहर)