आचारसंहिता लागू होताच राजकीय फ्लेक्स काढण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 08:01 PM2019-03-11T20:01:08+5:302019-03-11T20:02:06+5:30
आचार संहिता जारी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते.
पिंपरी : लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी होताच महापालिका परिसरातील फ्लेक्स काढण्यास सुरूवात झाली आहे. जाहिरात संस्थांची बैठक घेऊन फ्लेक्स काढण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सूचना केल्या आहेत. महापालिकेतील आचारसंहिता कक्षाच्या वतीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार परवाना विभागाच्या वतीने फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता रविवारी जारी केल्यानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी चौथ्या मजल्यावरील दालनात आज बैठक घेतली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्यासह शहरातील जाहिरात संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी आचारसंहिता कालखंडात काय करावे, किंवा काय करू नये, अशी माहिती दिली.
राजकीय फलक झाकले
दरम्यान नगरसचिव कार्यालयाच्या वतीने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच काही पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे काढून टाकली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच महापालिकेतील चौदा पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
आचार संहिता जारी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात होते. तसेच राजकीय लोकांच्या वतीनेही शहरातील बहुतांश फ्लेक्स काढून घेण्याचे काम सुरू होते.
....................
महापालिकेच्या संकेतस्थळावरील छायाचित्रे गायब
महापालिकेच्या संकेतस्थळावर महापौर राहूल जाधव, विविध पदाधिकारी यांची छायाचित्रे आहेत. राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी संगणक विभागाला केल्या होत्या त्यानुसार छायाचित्र काढून टाकली आहे.