पिंपरी स्थानकाच्या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:34 AM2019-04-02T02:34:38+5:302019-04-02T02:37:38+5:30
पिंपरी रेल्वे स्थानक : १७ डब्यांच्या गाडीसाठी सुविधा उपलब्ध, प्रवाशांची सोय
पिंपरी : फलाटांची लांबी कमी असल्याने पिंपरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होत होती. १७ डब्यांची गाडी थांबल्यास त्यासाठी फलाट कमी पडत होते. त्यामुळे प्रवाशांना गाडीत ये-जा करताना कसरत करावी लागत होती. ही कसरत टाळण्यासाठी गाडी दोनदा पुढे घ्यावी लागत होती. यात वेळ जात होता. तसेच प्रवाशांचा गोंधळ होत असे. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून येथील फलाटांची लांबी वाढविण्यात येत आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे.
पुणे-मुंबई लोहमार्गावरील उद्योगनगरीतील महत्त्वाचे स्थानक म्हणून पिंपरीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी होती. मात्र फलाटांची लांबी कमी असल्याने असा थांबा देण्यात तांत्रिक अडचण असल्याची सबब रेल्वे प्रशासनाकडून पुढे करण्यात येत होती. त्यामुळे फलाटांची लांबी वाढविण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पिंपरीतील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या फलाटांच्या दोन्ही दिशेला लांबी वाढविली जात आहे.
अपघातांना बसणार आळा
पिंपरी रेल्वे स्टेशन येथे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने शेकडो जणांचा मृत्यू झाला. याला आळा घालण्यासाठी येथे उपाययोजनेची मागणी करण्यात येत होती. स्टेशनला लागूनच भाजीमंडई आहे. तसेच दूध विक्रेते, फळ विक्रेते आणि फूल विक्रेते स्टेशनलगतच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. यातील बहुतांश जण पादचारी पुलाचा वापर न करता थेट लोहमार्ग ओलांडतात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. फलाटांची लांबी वाढल्याने रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबतील आणि अपघातांना आळा बसण्यास मदत होईल.
लोकलच्या फेऱ्या नव्हे डब्यांमध्ये वाढ
पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने फेऱ्यांऐवजी लोकलचे तीन डबे वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. असे असले तरी पुणे-लोणावळा दरम्यानच्या काही स्टेशनच्या फलाटांची लांबी कमी आहे. त्यांची लांबी वाढविण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. जेणे करून लोकलच्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
स्वयंचलित जिना
पिंपरी स्टेशन येथे प्रवाशांसाठी स्वयंचलित जिना उभारण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आदी प्रवाशांना जिना चढून जाणे सहज शक्य नसल्याने त्यांच्याकडून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रकार होत असे. अशा प्रकारांना आळा बसणार असून, स्वयंचलित जिन्यामुळे या प्रवाशांची गैरसोय टळली आहे.