राज्य सेवा परीक्षा : तिशीनंतर स्थिरस्थावर होणे अवघड, वयोमर्यादा वाढविल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:29 AM2018-01-03T03:29:19+5:302018-01-03T03:29:31+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वयापर्यंत परीक्षा देण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे.
- दीपक जाधव
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वयापर्यंत परीक्षा देण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीचे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) मोठयाप्रमाणात अनुकरण करण्यात आले आहे. युपीएससीची परीक्षा खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ४ वेळा देता येते तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७ वेळा तर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना ९ वेळा देता येते. एमपीएससीकडून किती वेळा परीक्षा देता येईल याचे कोणतेही बंधन घातलेले नाही. वयोमर्यादेमध्येही मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
साधारणत: २१ व्या वर्षी विद्यार्थ्यांना पदवी मिळते. ज्यांना स्पर्धा परीक्षांव्दारे करीअर करायचे आहे, ते पदवी मिळण्यापूर्वीच या परीक्षेचा अभ्यास सुरू करतात. काही विद्यार्थ्यांकडून दहावी नंतरच (१६ व्या वर्षी) स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली जाते. राज्य सेवेची किती वेळा परीक्षा द्यायची याचे बंधन नसल्याने खुल्या गटातील विद्यार्थी १८ वर्षे तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थी २३ वर्षे राज्य सेवेची परीक्षा देऊ शकतो.
शासकीय अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे मोठयाप्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थींनी वळले आहेत. लाखोंच्या घरात त्यांची संख्या पोहचलेली आहे. तीव्र स्पर्धेमुळे ८ ते १० वेळा परीक्षा देऊन निकाल येत नाहीत. तरीही अनेक विद्यार्थी आपला निकाल येईल या भरवशावर अभ्यास करीत राहतात.
वयाच्या जास्तीत जास्त तिशीपर्यंत विद्यार्थ्यांचे करीअर घडणे आवश्यक असते. त्यानंतर लग्न, स्थिरस्थावर होणे अशा अनेक प्रश्नांना तोंड देणे त्यांना अत्यंत अवघड जाऊ शकते. वयाच्या तिशीपर्यंत स्पर्धा परीक्षेव्दारे नोकरी न मिळाल्यास तो इतर पर्यायी मार्गांचा स्वीकार करून तिथे रमू शकत होता.
मात्र आता वयोमर्यादा वाढविल्यामुळे वयाच्या चाळीशी पर्यंत विद्यार्थी परीक्षा देऊ लागले आहेत. एकदा वय उलटल्यानंतर निकाल येण्याची शक्यता खूपच कमी झालेली असते. परीक्षांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत असल्यामुळे ते आपोआप मागे पडतात. मात्र अनेक वर्षांपासून अभ्यास करीत असल्यामुळे वयोमर्यादा उलटल्याशिवाय ते स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून देत नाहीत. यामुळे त्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान होत आहे.
नोकºया सोडून वळले
परीक्षा देण्याची वयोमर्यादा वाढविल्यानंतर अनेकांना अचानक आपण अधिकारी होऊ असे वाटू लागले. दुसºया क्षेत्रात नोकरी करीत असताना त्या सोडून ते स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. त्यातील ज्यांच्यामध्ये क्षमता आहे ते अधिकारी बनूही शकतात. मात्र सगळेच यामध्ये यशस्वी होत नाहीत. त्यांना मात्र या स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा घेतलेल्या निर्णयाचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
- सुरेश फुलपगार, बार्शी
नैराश्याचे प्रमाण वाढत आहे
पूर्वी वयाच्या तिशीपर्यंत स्पर्धा परीक्षा अभ्यास केला
जायचा त्यानंतर परीक्षा देण्याची वयोमर्यादाच संपत
असल्याने विद्यार्थ्यांकडून दुसरे पर्याय धुंडाळले जात होते. मात्र आयोगाने परीक्षा देण्याच्या वयोमर्यादेमध्ये मोठी वाढ
करण्याचा निर्णय दिड वर्षापूर्वी घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी तिशी पर्यंत अभ्यासामध्ये रेंगाळणारे
आता चाळीशीपर्यंत स्पर्धा परीक्षेच्या चक्रात अडकून पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. -दिनेश पाटील, सातारा
प्रश्नपत्रिकांमधील टाळाव्यात चुका
राज्य लोकसेवा आयोगाकडून तज्ज्ञांमार्फत प्रश्नपत्रिका काढल्या जातात. तरीही प्रश्नपत्रिकांमध्ये मोठयाप्रमाणात चुका असल्याचे वारंवार निर्दशनास आले आहे. आयोगाकडून पहिली उत्तरसुची व दुसरी उत्तरसुची अशा दोन उत्तरसुची प्रकाशित केल्या जातात. मुळात हा प्रकारच चुकीचा आहे. पहिली उत्तरसुचीच अंतिम असली पाहिजे, त्यामध्येच कोणतीही चुक असता कामा नये. त्यामुळे प्रश्नपत्रिकांमधील चुका आयोगाकडून टाळल्या जाव्यात अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.