गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; सांगवीत तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:31 AM2024-05-06T09:31:40+5:302024-05-06T09:31:57+5:30
तरुणाने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला
पिंपरी : गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत तरुणाला अटक केली. त्याच्या ताब्यातून १३ हजार ९५० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. सांगवी येथे शितोळे नगरमध्ये शनिवारी (दि. ४) दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई केली.
श्याम उर्फ लखन वामनराव लांडगे (२५, रा. शितोळेनगर, सांगवी. मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम लांडगे हा अंकित गॅस हे दुकान चालवत होता. त्याने त्याच्या दुकानात घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला. हे लहान सिलेंडर तो चढ्या दराने विकत असे. याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर छापा मारून कारवाई केली. यात श्याम याच्या ताब्यातून १३ हजार ९५० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.