Pimpri Chinchwad | स्वत:च्या अल्पवयीन मुलासह भाच्याला घेऊन केली चोरी; वाकडमधून एकाला अटक
By नारायण बडगुजर | Updated: March 25, 2023 15:57 IST2023-03-25T15:56:54+5:302023-03-25T15:57:45+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली...

Pimpri Chinchwad | स्वत:च्या अल्पवयीन मुलासह भाच्याला घेऊन केली चोरी; वाकडमधून एकाला अटक
पिंपरी : स्वत:चा अल्पवयीन मुलगा व भाचा यांचा वापर करून मोबाइल फोन चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे आठ मोबाइल जप्त केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
सुरेश दगडू जगताप (वय ३८, रा. कुसगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे कर्मचाऱ्यांसह हिंजवडी व वाकड भागात गस्तीवर होते. त्यावेळी मोबाइल फोन चोरी करणारा सुरेश जगताप याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने वाकड स्मशानभूमी येथून सुरेश जगताप याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे आठ मोबाइल जप्त केले. त्याने त्याचा अल्पवयीन मुलगा व भाचा यांचा वापर करून हिंजवडी भागातून मोबाइल फोन चोरी केल्याचे सांगितले. पुढील तपासासाठी सुरेश जगताप याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस कर्मचारी सुनील कानगुडे, किरण काटकर, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.