‘स्थायी’चे कारभारी आज बदलणार, भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:08 AM2018-02-20T07:08:24+5:302018-02-20T07:08:34+5:30
भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. दहा जणांची निवड केली जात असताना, नदीपलीकडचा आणि अलीकडचा हा निकष लावला जाणार आहे.
पिंपरी : स्थायी समितीचे आठ सदस्य मुदत संपल्याने चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यात भाजपाचे सहाजण बाहेर पडले; मात्र भाजपाने उर्वरित चार जणांचेही राजीनामे घेतले. चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीचे दोन बाहेर पडले. त्यामुळे स्थायी समितीच्या १६ पैकी १२ नवीन सदस्यांची निवड मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या समितीच्या सदस्यपदी कोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता आहे.
स्थायी समिती सदस्यपदावर दर वर्षी नव्यांना संधी देण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. भाजपा तसेच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. समितीवर आपली वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. राष्टÑवादी काँग्रेसकडे जागा दोन पण इच्छुकांची संख्या दहापट आहे. भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. स्थायी समितीवर संधी मिळावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.
स्थायी समितीवर पाच वर्षांत ५० जणांना संधी मिळणार हे भाजपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुक
भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. दहा जणांची निवड केली जात असताना, नदीपलीकडचा आणि अलीकडचा हा निकष लावला जाणार आहे. आमदार लांडगे समर्थक आणि आमदार जगताप समर्थक यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय जुने-नवे, निष्ठावंत-आयात या निकषांचाही आधार घेतला जाणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी सुमारे २० जण इच्छुक आहेत. त्यांच्यातही रस्सीखेच आहे. मात्र त्यांचा सदस्य निवडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीवर सदस्यपद मिळविण्यात कोण बाजी मारणार, हे मंगळवारी दुपारी स्पष्ट होणार आहे.