लॉकडाऊनमध्ये चढ्या दराने विक्रीसाठी केला १४ लाखांच्या विदेशी दारूचा साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:00 PM2021-04-22T22:00:00+5:302021-04-22T22:00:15+5:30
कासारवाडी, नाशिकफाटा येथे फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी : लॉकडाऊन काळात तीनपट जास्त दराने विक्रीसाठी विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी कारवाई करून १४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कासारवाडी, नाशिकफाटा येथे फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही कारवाई करण्यात आली.
प्रकाश किंमतराम आसवानी (रा. पिंपरी), नामदेव डोंगरे (रा. काळेवाडी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे हा विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी डोंगरे हा दारू विक्री करीत होता. तसेच १४ लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा मिळून आला. आरोपी डोंगरे याच्याकडे चौकशी केली असता आरोपी आसवानी यांची ही दारू असल्याचे त्याने सांगितले. लॉकडाऊन असल्याने चढ्या भावाने या दारूची विक्री करत असल्याचेही त्याने सांगितले. तसेच आणखीन कडक लॉकडाऊन लागल्यानंतर दारूची तीन पट जास्त किमतीने विक्री करणार होतो, असेही त्याने सांगितले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी राजेंद्र राठोड, उमेश देवकर, संजय चव्हाण, पोलीस नाईक, अजय डगळे, अनिकेत पाटोळे, सुमित देवकर, गणेश सावंत, समीर रासकर, विनोद वीर, संतोष महाडिक, चेतन साळवे, बाबा जाधव, प्रवीण शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.