चोरीला गेलेला ४७ लाखांचा ऐवज मूळ मालकांना मिळाला परत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:44 PM2020-01-09T15:44:37+5:302020-01-09T16:22:54+5:30
४७ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल नागरिकांना प्रदान
पिंपरी : सोनसाखळी, इतर दागिने, मोबाइल फोन, कॅमेरा असा चोरीला गेलेला ऐवज मूळ मालकांना परत मिळाला. २९ वेगवेगळ्या गुन्ह्यांत चोरट्यांनी चोरून नेलेला ४७ लाख ७७ हजार ५९९ रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. त्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येऊन पोलिसांचे आभार मानण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ''पोलीस रायझिंग डे ''निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे - २) श्रीधर जाधव, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ आॅगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. या आयुक्तालयामध्ये पहिलाच ' रेझिंग डे ' साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आयुक्तालयात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. ८) गुन्हेगारांकडून हस्तगत केलेला चोरीचा मुद्देमाल मुळ फियार्दींना परत करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २९ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुददेमाल परत करण्यात आला. त्यामध्ये २३ गुन्ह्यांतील एकूण ५७.९५ तोळे सोन्याचे दागिने, ३ गुन्ह्यांतील रोख रक्कम व मोबाईल असा १२ लाख ४३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल, एका गुन्ह्यामधील ८९ हजारांचा एक मोबाईल, एका गुन्ह्यामधील विविध कंपनीचे तीन लाख रुपये किमतीचे पाच कॅमेरे, आणखी एका गुन्ह्यातील ६३३२ किलो वजनाच्या १७ लाख ५९ हजार ५९९ रुपये किमतीच्या दोन कॉईल, असा ४७ लाख ७७ हजार ५९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना प्रदान करण्यात आला.