मोबाइल दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना अटक
By admin | Published: March 23, 2016 12:56 AM2016-03-23T00:56:37+5:302016-03-23T00:56:37+5:30
तीन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथील मोबाइल विक्रीचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
चिंचवड : तीन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथील मोबाइल विक्रीचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहबाज ऊर्फ मोठा रावण ताज शेख (वय १९, रा. रेल्वे फाटकजवळ, कासारवाडी), तालीफ ऊर्फ मिर्ची वली शेख (वय १९, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), लखन चंद्रकांत परहर (वय २१, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), किरण ऊर्फ दाद्या गौतम शिंदे (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १८) च्या रात्री फिर्यादी योगेश कोठावदे यांच्या मोहननगर येथील मोबाइल विक्रीच्या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटले व दुकानातून विविध कंपन्यांचे ३२ मोबाइल, रिचार्ज व्हाऊचर, चार्जर असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. पिंपरी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना मोबाइलचे दुकान फोडणारे चोरटे हे पिंपरीतील एका कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक बुधकर, पोलीस उपनिरीक्षक हरीष माने हे घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. मात्र, चोरट्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले असता, त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. या आरोपींमध्ये किरण शिंदे व शहबाज शेख हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
चोरट्यांना मंगळवारी (दि. २२) न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. (वार्ताहर)