Pune News: चिंचवड-आकुर्डे रेल्वे रुळावर दगडांचा ढीग, घातपाताची शक्यता
By रोशन मोरे | Published: October 6, 2023 07:41 PM2023-10-06T19:41:10+5:302023-10-06T19:43:03+5:30
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टवाळखोरांचा हा प्रयत्न फसला...
पिंपरी : चिंचवड-आकुर्डी रेल्व स्टेशनच्या दरम्यान अपलाईनवर रेल्वे रुळावर मोठ मोठे दगड ठेवल्याचे निदर्शनास आले.या दगडांमुळे रेल्वेला अपघाताचा धोका होता. मात्र, रेल्वे अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी हे दगड लगेच काढून टाकले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टवाळखोरांचा हा प्रयत्न फसला आहे.
मिळालेल्या मााहितीनुसार, रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले होते. त्यांना आकुर्डी स्टेशनजवळील अपलाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवले असल्याचे दिसून आले. त्यांनी हे दगड बाजुला करत ताबडतोब डीआरएम कार्यालय, पुणे येथे सिव्हिल इंजिनीअरिंग कंट्रोलला याची माहिती दिली आणि त्यांनी जवळ येणाऱ्या गाड्यांचा वेग कमी करण्यास सांगितले. या प्रकरणी अधिक तपास आरपीएफ पोलिस करत आहेत.
रेल्वे रुळावर दगड ठेवल्याची माहिती तपासणीसाठी केलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांनी लगेच ते दगड काढून टाकले. पाच ते सात मिनिटांमध्ये गाड्या पुर्ववत धावण्यास सुरुवात झाली.
- रामदास भिसे,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे