ब्रिटिशकालीन पुलावरची वाहतूक बंद
By admin | Published: June 26, 2017 03:34 AM2017-06-26T03:34:20+5:302017-06-26T03:34:20+5:30
मागील वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात कोकणातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर, प्रशासन खडबडून जागे झाले. राज्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : मागील वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात कोकणातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर, प्रशासन खडबडून जागे झाले. राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरची वाहतूक तत्काळ बंद करून सर्वच पुलांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भोर शहरातील नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरची वाहतूक काही महिने बंद होती; मात्र पुलाचे आॅडिट झाले आहे. पूल धोकादायक आहे का नाही, याचा आॅडिट रिपोर्ट येण्याआधीच पुन्हा सुरू केला आहे. एक वर्ष होऊनही प्रशासन व बांधकाम विभाग गंभीर नाही. त्यामुळे पुलावरील वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
भोर-पुणे मार्गावरील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन राणी लक्ष्मीबाई पुलाला ८४ वर्षे झाली असून पूल जीर्ण झाला आहे. या पुलाच्या मचव्यावर पिंपळ, वड व इतर झाडे उगवली आहेत. यामुळे पुलाचे मचवे खराब होऊन पूल धोकादायक बनला आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पुलाची डागडुजी केली नाही, तर धोका निर्माण होऊ शकतो.
पुलाच्या दगडी बांधकामात पिंपळ, वडाच्या झाडांचे सामराज्य पसरले असून झाडांची मुळे दगडांमध्ये खोलवर रुजल्याने दगडी बांधकामाला भेगा पडत आहेत. दगडी मचवे खराब होत आहेत. पिंपळाच्या झाडांनी पिलरला विळखा घातला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.