महावितरणच्या बिलातील गोंधळ थांबवावा
By admin | Published: March 22, 2017 03:15 AM2017-03-22T03:15:02+5:302017-03-22T03:15:02+5:30
एका ग्राहकाच्या तक्रारीवरून सर्वच ग्राहकांचा सारासार विचार करीत पारदर्शक बिलप्रणाली अवलंबावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही,
वाकड : एका ग्राहकाच्या तक्रारीवरून सर्वच ग्राहकांचा सारासार विचार करीत पारदर्शक बिलप्रणाली अवलंबावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही, त्याचे अतिरिक्त पैसे जाणार नाहीत यासाठी गंभीर पावले उचलावीत. गेलेली जादा रक्कम ग्राहकांना परत करावी अशी मागणी वाकडच्या रहिवाशांनी महावितरणकडे बैठकीदरम्यान केली.
गेल्या महिन्यात वाकडमधील पीसी सहाच्या महावितरण ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव बिले आल्याने मोठा गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनादेखील याबाबत ईमेलद्वारे तक्रार समजली. अखेर महावितरणने नम्र निवेदनाद्वारे पुढील बिलात अतिरिक्त रक्कम वळती करणार असल्याचे सांगितले. मात्र या एका आश्वासनाने वाकडकर शांत न बसता सर्वच स्तरावर वाकडच्या रहिवाशांनी आवाज उठविल्यानंतर अखेर महावितरणने या ग्राहकांची बैठक घेत त्यांचे प्रश्न समाजावून घेतले. या वेळी अनेक प्रश्नांचा भडीमार ग्राहकांनी केला. बैठकीला शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राहुल कलाटे, महावितरण अधिकारी महेंद्र दिवाकर, नगरसेवक तुषार कामठे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. एम. सावंत, नगरसेविका ममता गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश चोंधे, उपअभियंता अनिल गौडा, नितीन विसपुते (संगणक विभाग प्रमुख), सचिन गुणाले, अरुण देशमुख,सचिन लोंढे, सुदेश राजे, सुधीर देशमुख किरण वडगामा, अभिजित पवार, चंद्रशेखर मेटकर, दत्तात्रय देशमुख, शिवाजी कटके यांच्यासह वाकडमधील सर्व सोसायट्यांतील रहिवासी उपस्थित होते.
महावितरणच्या सुमारे लाखभर ग्राहकांच्या बिलात झालेला गोंधळ अरुण देशमुख यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वाकड परिसरातील सर्व सोसायट्यांच्या सभासदांच्या ग्रुपवर पोस्ट टाकत आवाज उठविला. त्याला सर्वांचे अभिप्राय सुरू झाले. ग्रुपमधील अॅक्टिव्ह सभासद सचिन गुणाले यांनी पुढाकार घेतला. ते सध्या कॅनडा या देशात आहेत. त्यांनी महावितरणचे सर्वोच्च अधिकारी संजीव कुमार यांना ई मेल करीत सर्वांना मेल करायला सांगितले. असे असंख्य मेल त्यांच्या मुंबई कार्यालयाला आणि मुख्यमंत्री कार्यालयात गेल्याने सर्वच स्तरांवर महावितरण कार्यालयात फोन सुरू झाल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले.
यानंतर वाकड रस्त्यावरील नंदन इन्स्पेरा या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत व्हिलिंग चार्जेस वाढल्याने बिले वाढली असावीत, असा अंदाज वर्तवीत रीडिंगसाठी ६० अतिरिक्त माणसे नेमली आहेत. अॅडव्हान्स पेमेंट घेणाऱ्यांवर कठोर करवाई करणार, ३० दिवसांची बिलिंग सायकल कायम ठेवत सहा ते आठ महिन्यांचा डाटा चेक करू आणि जादाचे पैसे वळते करू, व्हर्जनमुळे बिल कमी-जास्त येते, इथून मागे अनेकदा बिल कमी देखील आली आहेत. मात्र त्याबद्दल कोणी बोलत नाहीत. जादा बिल येताच ओरड सुरु होते. मात्र पीसीवाईज ते चेक करवून आम्ही तूट भरून काढू ,असे आश्वासन महावितरणच्या अधिका-यांनी दिले.
दीड लाख ग्राहकांपैकी गेल्या आठ महिन्यांत ग्राहकांना आलेली जादाची सहा ते आठ कोटींची बिले परत करणार का? हा घोळ थांबविण्यासाठी पोलीस मित्रच्या धरतीवर एमएसईबी मित्र नेमा, ३० दिवसांचे बिलिंग सायकल कायम करा, वाकड परिसरात केवळ ताथवडे आणि रहाटणी हे कार्यालय असल्याने मोठी कसरत होते; त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी महावितरणचे एक कार्यालय उभारावे. यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत बिल भरणार नाही, असे मुद्दे ग्राहकांनी उपस्थित केले. (वार्ताहर)