PCMC Muncipal Corporation: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा; सुरक्षा साधनांविना नालेसफाई
By विश्वास मोरे | Published: May 24, 2024 12:15 PM2024-05-24T12:15:55+5:302024-05-24T12:16:53+5:30
पिंपरी चिंचवड महापलिकेकडून आम्हाला कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत, दाद मागायची कुणाकडे? आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पावसाळापूर्व कामे सुरू केली आहे. नालेसफाईचे काम मोठ्याप्रमाणावर यांत्रिकी पद्धतीऐवजी कामगारांचा जीव धोक्यात घालून केले जात आहे. श्रीमंत आणि स्मार्ट महापालिका म्हणून बिरुद मिळविणारी महापालिका आरोग्य कर्मचाºयांना सुरक्षा साधणे पुरवित नसल्याचा आक्षेप कामगारांनीच नोंदविला आहे. 'ही कसली स्मार्ट सिटी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा, अशी मागणी कामगार करीत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आरोग्यविभागात कायम तत्वावर १ हजार ८४५ कामगार, ३०५ घंटागाडी कामगार आणि ठेकेदारांकडील २ हजार ३९४ कामगार असे मनुष्यबळ आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. दैनंदिन साफसफाई, रस्ते स्वच्छता, किटकनाशक फवारणी, नाले सफाई, कचरा संकलन आणि वाहतूक, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी कामे महापालिकेच्या आरोग्य विभागाततर्फे केली जातात. तसेच शहर स्वच्छतेकामी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामगार नियुक्त केले जात आहेत. त्यात सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मलेरिया निरीक्षक, वाहन चालक, आरोग्य सहायक, मुकादम, गटरकुली, सफाई कामगार, सफाई सेवक, कचराकुली, मजुर, शिपाई, मेंटेनंस हेल्पर सेवेतील कामगारांचा समावेश आहे.
कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष
दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी नालेसफाईची कामे हाती घेण्याचा सोपस्कार पुर्ण केला जातो. आरोग्य कर्मचाºयांना गमबूट, मास्क, हातमोजे, अवजारे पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, नाला - गटारे आणि मलनि:सारण वाहिन्यांची स्वच्छता करताना आवश्यक हातमोजे, गम बूट आणि इतर साहित्य देखील वेळेत मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
या कायद्याकडे होतेय दुर्लक्ष
आरोग्य क्षेत्रात कार्यरत प्रत्येक कर्मचाºयाला मुलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी कायदेशीर तरतूद ‘हाताने मैला साफ कार्य करण्यास प्रतिबंध आणि सफाई कामगारांचे पुनर्वसन अधिनियम २०१३’ मध्ये आहे. मात्र ,दरवर्षी पिंपरी - चिंचवड महापालिका या कायद्याचे उल्लंघन करीत आहे.
स्मार्ट सिटीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत महापालिका सजग नसल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सफाई कामगारांना ६४ प्रकाराचे साहित्य पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यंदाही नालेसफाई करताना ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे विदारक चित्र आहे. सुरक्षासाधनांविना होत असलेल्या साफसफाई प्रकरणी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे दाद मागण्यात येईल. -अॅड. सागर चरण ( सदस्य, जिल्हा दक्षता समिती)
मी पाच वर्षांपासून आरोग्य विभागात ठेकेदारीने काम करतो. अडचणीच्या ठिकाणी नालेसफाची कामे दिली जातात. कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत, दाद मागायची कुणाकडे. जीवाला धोका झाला तर करायचे काय, याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यायला हवी - एक कर्मचारी, आरोग्य विभाग.