लघुशंकेसाठी थांबले अन् दरोडेखोरांनी गाठले; द्रुतगती मार्गावर ट्रकचालकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:37 PM2022-04-12T14:37:12+5:302022-04-12T14:39:27+5:30
पहाटे साडेचारच्या सुमारासची घटना...
पिंपरी : लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकाला व त्याच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुटले. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडी मोबाईल व रोकड असा १९ हजारांचा मुद्देमाल घेऊन गेले. दरोडाप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से गावाच्या हद्दतील फुड माॅल जवळ सोमवारी (दि. ११) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
आदर्श अनिल चौधरी (वय १९, रा. वर्सोली, लोणावळा), अजय गुलाब साळुंखे (वय १९, रा. दत्तवाडी, मुळशी), संजय मारुती चव्हाण (वय २२, रा. समतानगर, लोणावळा), गणेश राजू काळे (वय २२, रा. वडगाव मावळ) आणि अमृत रवी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ट्रकचालक जमाल कमल खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे (शिरगाव चौकी) येथे फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक व त्यांचा भाऊ अफताब हे पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरून जात होते. उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या विरुद्ध दिशेला ट्रक थांबवून फिर्यादी लघुशंकेसाठी ट्रकमधून खाली उतरले. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी मोबाईल व रोख रक्कम असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला, असे फिर्यादीत नमूद आहे.