मोकाट जनावरांचा निगडीकरांना त्रास
By admin | Published: January 12, 2017 02:38 AM2017-01-12T02:38:03+5:302017-01-12T02:38:03+5:30
रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी
निगडी : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी रस्त्यावर ठिय्या मांडून बसणारी मोकाट जनावरे निगडीकरांची नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास मात्र दुर्लक्ष होत आहे.
निगडीतील जुना पुणे-मुंबई रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही जनावर दिसले की, काढता पाय घेतात.
रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाही. भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक व यमुनानगर या भागात वाहनांची व नागरिकांची दररोज गर्दी असते. त्या ठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात.
मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले, तर ही जनावरे भाजीपाल्यावर ताव मारतात.
ग्राहकांच्या हातातील पिशव्यातही तोंड घालायला जनावरे मागेपुढे पाहत नाहीत. ऐन गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जिवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे.
निगडी परिसरात बहुतांश जनावरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच धांदल उडते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. (वार्ताहर)