सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:04 PM2018-06-14T17:04:08+5:302018-06-14T17:04:08+5:30
सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत.
पिंपरी : महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा बसावा म्हणून राजपत्रित अधिकारी महासंघाने प्रयत्न केले होते. त्यानुसार राज्य सरकारने भारतीय दंडविधानाच्या कलमात सुधारणा केल्या आहेत. याबाबतचे आदेश सात जूनला दिले आहेत. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत. निगडीतील एका नगरसेवकांने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले होते. भारतीय दंडविधान कलम ३३२, ३५३ अन्वये दाखल होणारे खटले यापुढे दखलपात्र, अजामीनपात्र झाले असून ते सत्र न्यायालयात चालविले जाणार आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाने भारतीय दंडविधान आणि दंडप्रक्रिया संहितेच्या कलमांमध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.
महापालिकेचे मुख्य लेखापाल व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजेश लांडे म्हणाले, कलमामध्ये सुधारणा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होता. आता यामध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे. हल्ल्यांच्या घटनांना आळा बसणार आहे.