कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:18 PM2018-07-26T17:18:02+5:302018-07-26T17:32:47+5:30

एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला.

strict strike in Kamshet, full support from all levels | कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

Next
ठळक मुद्देमावळ तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने मावळ बंद या संबंधीचे सर्व शासकीय विभागांनानिवेदन

कामशेत : सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला कामशेत शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढत जुना मुंबई पुणे महामार्ग सहारा कॉलनी येथे रोखून अनेकांची भाषणे झाली. यावेळी काही मराठा युवकांच्या भाषणां मध्ये उपस्थित राजकीय पदाधिकारी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्या असे सांगितले असता वातावरण गंभीर झाले. आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर कामशेत मधील काही उनाड अल्पवयीन मुलांनी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका मराठा होतकरूच्या मालवाहू पिकअपची दगड मारून काच फोडली. याशिवाय उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारलेल्या शेडवर दगड मारण्याचे प्रकार घडले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही ऐनवेळी गर्दी आटोक्यात आणणे अवघड झाले होते. 
    मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ, कारखाने सार्वजनिक व खाजगी वाहतूक सेवा, शाळा, महाविद्यालये आदी गुरुवारी बंद होती. याच प्रमाणे महामार्गावर वाहनांची संख्या कमी होती. काही ठिकाणी किरकोळ प्रकार सोडता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळ तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने मावळ बंद या संबंधीचे निवेदन सर्व शासकीय विभागांना देण्यात आले होते. मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चास सर्व स्तरावरून पाठिंबा मिळाला. मावळात सर्व प्रथम सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कान्हेफाटा येथे कान्हे व अंदर मावळ भागातील मराठा समाजाच्या वतीने जुना मुंबई पुणे महामार्ग टायर जाळून रोखण्यात आला. त्यानंतर कान्हे ते टाकवे औद्योगिक वसाहतीतील सुरु असलेल्या सर्व कंपन्या शांततेत बंद करण्यात आल्या. सकाळी कान्हे रेल्वे स्टेशन येथे काही काळ रेल्वे मार्ग अडवून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी मराठा आरक्षणाकरिता स्वत:ला जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

Web Title: strict strike in Kamshet, full support from all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.