‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:27 AM2017-11-04T04:27:55+5:302017-11-04T04:28:14+5:30
शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.
पिंपरी : शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.
आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ ट्रकच्या धडकेत अशीष पावसकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू होताना आणि सुटताना तेथील रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे आहे. चिंचवडमधील काकडे पार्क, श्रीधरनगर, भोईरनगर, पवनानगर, वाल्हेकरवाडी परिसरात विविध शाळेंसमोर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते. चापेकर चौक व जुना जकात नाका परिसरात असणाºया शाळा व महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पहात उभे असतात. येथे बस थांबे नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. शाळेची इमारत दिघी गावठाणात असून, परिसरातील शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३५० च्या वर आहे. शाळेत येण्यासाठी दिघी-आळंदी रस्ता ओलांडून यावे लागते. लक्ष्मणनगर शाळा भरण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेले पालक रस्त्यातच वाहने पार्क करतात.
वाहनपरवाना असल्याशिवाय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पार्किंग करू देऊ नये, तसेच पालकांनी पाल्याला परवाना असल्याशिवाय गाडी हातात देऊ नये, यासारख्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
माणुसकी हरवतेय
अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी व्हॉट्सअॅपद्वारे फोटो काढण्याची घाईच जादा झालेली असते. तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. पण अपघातानंतर हे चित्र दिसत नाही. त्यामुळे माणुसकी हरवत चालली आहे, असे मत व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांची स्टंटबाजी जिवावर
शहर परिसरात अनेक विद्यार्थी विनापरवाना वाहन चालवितात. तसेच ते अनेक वेळा स्टंटबाजी करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. फोनवरच बोलत वाहन चालविण्याचा नवा फंडा तयार केला आहे. त्यामुळे अनेक वेळा हॉर्न वाजविला तर ऐकायला न येणे, पुढून येणारे वाहन न दिसणे यासारखे प्रकार घडत आहेत. मुलांची स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.