ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण
By admin | Published: June 3, 2017 02:27 AM2017-06-03T02:27:47+5:302017-06-03T02:27:47+5:30
मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून मोटारीला काळी काच लावलेल्या वाहनचालकाला अडवून दंड भरण्यास सांगितले
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून मोटारीला काळी काच लावलेल्या वाहनचालकाला अडवून दंड भरण्यास सांगितले असता, वाहनचालकाने हिंजवडीत वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या वॉर्डनला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडी चौकात घडली.
याप्रकरणी जितेंद्र लाखे (वय २३, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक बबन हुलावळे (वय ४३, रा. श्रीनाथनगर, हुलावळेवस्ती, हिंजवडी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हिंजवडी वाहतूक विभागामार्फत वॉर्डन म्हणून काम करतात. त्यांनी गुरुवारी काळी काच असलेली आरोपीची मोटार अडवली. दंडाची पावती फाडण्यास सांगितले. मात्र, आरोपीने ‘‘तुम्ही इतर काळ्या काचेच्या गाड्या का नाही अडवत, असे बोलून दंडाची पावती फाडण्यास नकार दिला. तसेच त्याने वॉर्डन जितेंद्र यांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.