अतिक्रमण कारवाईला गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:25 PM2019-03-01T17:25:35+5:302019-03-01T17:49:32+5:30
अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते.
पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आठ ते दहा जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निगडीतील टिळक चौक येथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
साईनाथ रामभाऊ खंडीजोड (वय ५५, रा. घरकुल वसाहत, चिखली), अनिल तुकाराम बारवकर (वय ५०, रा. कृष्णानगर, चिंचवड), राम रंगराव बिरादार (वय ३५, रा. नेवाळेवस्ती, चिखली), रणजित प्रभाकर देशमुख (वय २३, रा. चिखली), काशिनाथ नखाते यांच्यासह या परिसरातील इतर हातगाडीचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम परवानगी व अतिक्रमण नियंत्रण निर्मुलन विभागाचे अरुण शामराव सोनकुसरे (वय ५३, रा. अजमेरा हौसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोनकुसरे हे अ प्रभाग कार्यालयाकडील अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीररित्या लोकांचा जमाव जमवून कारवाईस विरोध केला. सोनकुसरे व त्यांचे कर्मचारी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.