मतमोजणीची जोरदार तयारी
By admin | Published: February 23, 2017 02:49 AM2017-02-23T02:49:35+5:302017-02-23T02:49:35+5:30
प्रभाग क्रमांक २२, २३ व २७ मधील पालिका निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले
रहाटणी : प्रभाग क्रमांक २२, २३ व २७ मधील पालिका निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. अगदी सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत होते. या तीनही प्रभागाची मतमोजणी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखेखाली पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी मत मोजणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल यांनी करून घेतले.
या तीनही प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एकेका प्रभागाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात आधी प्रभाग क्रमांक २२ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक २३ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात शेवटी प्रभाग क्रमांक २७ चा निकाल जाहीर केला जाणार आहे.
थेरगाव येथील पालिका शाळेच्या प्रांगणात मंडप टाकण्यात आला असून, कर संकलन इमारतीच्या मुख्य गेटपासून जमिनीवर गालिचा टाकण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूंना उमेदवार प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक २२ मधील ५४ मतदान केंद्रांची मतमोजणी होणार. प्रभाग क्रमांक २३ मधील ३६ केंद्रावरील होणार तर प्रभाग क्रमांक २७ मधील ४४ केंद्रावरील मतमोजणी होईल. (वार्ताहर)
तासाच्या आत लागणार निकाल
मतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. निकाल नागरिकांना कळावा, म्हणून स्पिकराची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांवर एकाच ठिकाणी दहा कर्णे बांधण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार यंदा मतमोजणीची फेरी जाहीर केली जाणार नाही. एकदाच निकाल जाहीर केला जाणार आहे. तासाच्या आत प्रभागाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दुपारी बारापर्यंत चित्र स्पष्ट होईल.