शहरात पावसाची जोरदार हजेरी
By admin | Published: October 12, 2015 01:08 AM2015-10-12T01:08:16+5:302015-10-12T01:08:16+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांची धांदल उडाली. रविवारी दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असल्याने उकाडा जाणवत होता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांची धांदल उडाली. रविवारी दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असल्याने उकाडा जाणवत होता. चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे वातावरणातही गारवा होता. पाचच्या सुमारास जोरदार पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, पाऊस झाला नाही. त्यानंतर रात्री साडेआठला जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकजण फिरण्यासाठी, तसेच खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मात्र, जोरदार बरसलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.
तळेगाव परिसराला झोडपले
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन आणि परिसराला रविवारी सायंकाळी बरसलेल्या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. वाढत्या उकाड्यापासून थोड्या वेळासाठी का होईना, पण तळेगावकरांची सुटका झाली. सातच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तळेगाव स्टेशनसह माळवाडी, कोटेश्वरवाडी, आंबी, इंदोरी, नवलाख उंबरे, नाणोली तर्फे चाकण या परिसरातही जोरदार पाऊस झाला. भाताची खाचरे भरून गेली. या पावसाने नदी, ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. रात्री नऊच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. (वार्ताहर)