निवडणुकीत पोलिसांची ओढाताण'
By admin | Published: February 13, 2017 01:37 AM2017-02-13T01:37:23+5:302017-02-13T01:37:23+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीच झटते; मात्र निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पोलीस यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू झाली.
वाकड : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीच झटते; मात्र निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पोलीस यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया आणि विविध पक्षांच्या पॅनलचा प्रचार आणि दररोज निघणाऱ्या रॅलींना आवरताना पोलिसांची मोठी ओढाताण होऊन दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे.
उमेदवारांना कायद्याचा धाक
निवडणुकीचे बिगूल वाजताच पोलीस यंत्रणा तेवढीच सजग आणि सज्ज झाली. महापालिकेच्या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून खुर्चीसाठी वाट्टेल ते म्हणत एकमेकांच्या जीवावर उदार झालेले अनेक उमेदवार केवळ पोलीस यंत्रणा आणि कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या भीतीपोटी शांत आहेत. मात्र तरीही या तणावाच्या वातावरणात अनेक उमेदवारांच्या रॅली, प्रचार सभा, कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. अनेकदा एकाच प्रभागातून दोन-तीन उमेदवारांच्या रॅली आगे-मागे निघत असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. '
अपुरे मनुष्यबळ
निवडणूक लढवीत असलेल्या विविध पक्षांचे चार-चार उमेदवार आणि अपक्ष या सर्वांचाच निवडणूक कार्यक्रम, प्रचार जोरदार सुरूआहे. मात्र तुटपुंजे मनुष्यबळ असलेल्या पोलीस यंत्रणेवर ताण अनंत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. सध्या ‘ड’ प्रभाग कार्यालयासाठी वाकड पोलिसांचे एक अधिकारी, ४ कर्मचारी तैनात आहेत. तर थेरगाव करसंकलन कार्यालयात दोन अधिकारी दोन कर्मचारी आहेत. प्रभाग २५ वाकड ताथवडे पुनावळेसाठी पोलिसांचा एक अधिकारी, एक कर्मचारी आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच अर्ज दाखल करण्यासाठी अर्जासोबत जोडायच्या असलेल्या अनेक एनओसी मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांत धांदल उडाली. यानंतर अर्जस्वीकृती, छाननी, इच्छापत्र भरून देणे, माघार आणि अपक्षांना चिन्हवाटप अशा अनेक क्लिष्ट प्रक्रिया प्रभागनिहाय पार पडल्या.
या दरम्यान एक खिडकी योजनेद्वारे उमेदवारांना मदत झाली. मात्र या सर्व निवडणूक कार्यक्रमासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयावर पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने या सर्व बाबी ठरावीक घटना वगळता निर्विघ्न पार पडत आहेत.
निवडणूक लागताच सर्वांत जादा कसरत पोलिसांची होत आहे. काही पोलीस ठाण्यांच्या पोलिसांच्या हद्दीत पंचायत समिती हिंजवडी गण, माण गण, जिल्हा परिषदेचा माण गट, पुणे मनपाचा प्रभाग क्रमांक ९ व १०, तसेच पिंपरी-चिंचवड मनपा प्रभाग २५ ‘ड’ प्रभाग आदी भाग असल्याने तुटपुंज्या मनुष्यबळाद्वारे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौक येथे २४ तास हा नाकाबंदी पॉईंट केल्याने येथे दोन पाळीत एक अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत. (वार्ताहर)