विद्यार्थ्यानं 'फी माफीसाठी' डोकं आपटून फोडली प्राचार्य कक्षाच्या दरवाजाची काच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:09 PM2021-09-29T20:09:35+5:302021-09-29T21:09:57+5:30
पिंपरीतील घटना : विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील कर्मचारी जखमी
पिंपरी : महाविद्यालयाच्या शैशक्षणिक शुल्क (फी) माफ करावे, अशी मागणी करीत विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर डोके आपटले. यात दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील एक कर्मचारी जखमी झाला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी गाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी दुपारी ही घटना घडली.
सुरेश देसाई, असे जखमी झालेल्या महाविद्यातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह विद्यार्थी जखमी झाला आहे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले. जखमी विद्यार्थी हा त्याच्या वर्गमित्रासह प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या कक्षामध्ये आला. त्यावेळी फी माफीविषयी वाद झाला. दरम्यान विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर स्वत:चे डोके आपटून दरवाजाची काच फोडली. यात त्या विद्यार्थ्यासह कर्मचारी सुरेश देसाई जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्याने काचेचा तुकडा घेतला आणि बाहेर गेला. काही गैरप्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला धरून आणले तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्याला थांबविले. यात संबंधित विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे शिक्षक किंवा कर्मचारी यांनी कोणीही मारहाण केलेली नाही, असे महाविद्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
पिंपरी : शैक्षणिक शुल्क माफ करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्याने डोकं आपटून फोडली प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजाची काच. https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/jA69oT9ATB
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2021
व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही जणांची गर्दी दिसत असून, एकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज येत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. त्यात प्राचार्य, शिक्षक तसेच इतर काही जण आहेत. एक विद्यार्थी त्यांच्याशी बोलताना अचानक दरवाजावर डोके आपटत आहे. त्यामुळे दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे.
''महाविद्यालयात फीवरून वाद झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार केले. याप्रकरणी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले.''