विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: November 24, 2015 12:58 AM2015-11-24T00:58:10+5:302015-11-24T00:58:10+5:30
तळेगाव शहर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या दोन घटनांत महाविद्यालयीन विद्यार्थिनी व एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या दोन घटनांत महाविद्यालयीन विद्यार्थिनी व एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तळेगावजवळील आंबी येथील डॉ. डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या शीतल विलास काळे (वय १८, मूळ रा. शिवाजीनगर, मुरुड, ता. जि. लातूर) हिने लेडीज होस्टेलमधील जी-१५ खोलीत नायलॉन दोरीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार दुपारी उघडकीस आला. याबाबत कॉलेजचे प्रशासक बबन गायकवाड यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. शीतल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून, पोलीस उपनिरीक्षक जी.एस. शिंदे अधिक तपास करीत आहेत.(वार्ताहर)
दुसऱ्या एका घटनेत नववीत शिकणाऱ्या विष्णू रंगनाथ यादव (वय १५, रा. स्वराजनगरी, तळेगाव स्टेशन) या शाळकरी मुलाने दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृत मुलाचे मामा कुणाल वाळुंद्रा (वय २५, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार नवनाथ सरमाने अधिक तपास करीत आहेत. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. माधव वाघमारे यांनी शवविच्छेदन केले. दोन्ही घटनांमधील आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.