शाळेच्या धोकादायक इमारतीच्या आवारात विद्यार्थ्यांचा होतोय वावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 02:19 PM2019-11-30T14:19:25+5:302019-11-30T14:21:36+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
शीतल मुंडे-
पिंपरी : भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमधून समोर आले आहे. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने शाळेच्या आवारातच पत्र्याचे शेड उभारून वर्गखोल्या तयार केल्या. तरीही विद्यार्थी येथील धोकादायक इमारतीमध्ये ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, ही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेविद्यार्थ्यांच्या पालक संताप व्यक्त करीत आहेत.
........
धोकादायक इमारतीचा फलक
महापालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयाने दि. ३ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला भोसरी येतील शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर दि. २९ सप्टेंबर २०१९ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा भरवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. तीन महिन्यांपासून बाजुच्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरत आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा वावर हा धोकादायक इमारतीच्या आवारात असतो. या इमारतीमध्ये विद्यार्थी मध्यान्य भोजन घेतात, तसेच खेळतात.
............
दुघर्टना घडल्यास जबाबदार कोण?
महापालिका प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याचा सूचना फलक लावून हात वर केले आहेत. मात्र, शाळेची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटनुसार सुरक्षित नसून, परिसरात वापर करण्यास मनाईचा सूचना फलक उभारून प्रशासन जबाबदारी झटक आहे. मात्र, बाजुच्या पर्यायी शाळेतील विद्यार्थी या इमारतीमध्ये ये-जा करत असतात. संभाव्य धोका महापालिका प्रशासनाला, शाळा प्रशासनाला माहीत असतानादेखील कोणीही ही जबाबदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सजग पालक व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
...........
इमारत हटविण्याकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळेची धोकादायक इमारत पाडण्याबाबत स्थापत्य विभागाला पत्र देण्यात आले आहे. मात्र स्थापत्य विभाग शिक्षण विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवत आहे. इमारत हटविण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करीत टोलावाटोलवी सुरू केल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनातील दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याचेही समोर आले आहे.
.......
खबरदारीची आवश्यकता
शाळेची इमारत धोकादायक आहे. तरीदेखील त्या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये जाऊ नयेत म्हणून शिक्षकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा काही पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
.....
श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक आहे़ त्यामुळे शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. धोकादायक इमारत हटविण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्थापत्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. इमारत हटविण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. - पराग मुंडे, प्रशासकीय अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका
......