शहरातील विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल
By Admin | Published: June 30, 2017 03:52 AM2017-06-30T03:52:50+5:302017-06-30T03:52:50+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)ला पुरविण्यात येणाऱ्या ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस गुुरुवारी अचानक बंद राहिल्याने पीएमपी प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)ला पुरविण्यात येणाऱ्या ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस गुुरुवारी अचानक बंद राहिल्याने पीएमपी प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील एकूण १६१ बसेस बंद होत्या. बसची कमतरता असल्याने तासन्तास बसची वाट पाहत प्रवासी उभे असल्याचे चित्र विविध बसस्थानकांवर दिसत होते.
भाडेतत्त्वावरील बसेस गुरुवारी सकाळी बंद झाल्या. यामुळे शहरातील निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील बस आगारातच उभ्या होत्या. बसवरील वाहकांनाही बसून राहण्याची वेळ आली. दरम्यान, गुरुवारी दिवसभर शहरात केवळ खात्याच्याच बसेस धावत होत्या. निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील एकूण १६१ बसेस बंद होत्या.
निगडी आगारातून मनपा भवन, पुणे स्टेशन, हडपसर, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी, कात्रज, हिंजवडी, देहूगाव, वडगाव आदी मार्गांवर बस धावतात. निगडी आगार हे पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आगार मानले जाते. यासह भोसरी आणि पिंपरी आगारातूनही विविध मार्गांवर बस धावतात. मात्र, गुरुवारी पुकारलेल्या संपामुळे अनेक मार्गांवरील बस बंद ठेवण्यात आल्या. तर काही मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या.
या संपामुळे चाकरमानन्यांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. विद्यार्थ्यांनाही बसेससाठी धावपळ करावी लागली. अचानक बस बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली.