विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ भारतचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 01:52 AM2016-10-12T01:52:43+5:302016-10-12T01:52:43+5:30
: हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे...., माझा भारत, बलशाली हा माझा भारत....., हिरवी छाया, हिरवी माया... आणि सारे जहाँ से अच्छा..., अशा गीतांमधून
पिंपळे गुरव : हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे...., माझा भारत, बलशाली हा माझा भारत....., हिरवी छाया, हिरवी माया... आणि सारे जहाँ से अच्छा..., अशा गीतांमधून देशभक्ती व स्वच्छ भारतचा नारा विविध शाळांमधून स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी गीतमंच या कार्यक्रमामधून दिला.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून आलेल्या पंचावन्न शाळेतील दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगान करीत स्काऊट-गाईडचे राष्ट्रीय चिन्ह साकारले. पंतसचिव स्काऊट क्रीडांगण येथे पुणे भारत स्काउट आणि गाईड जिल्हा संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले. उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर देशमुख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा आयुक्त हरुण आतार, भाऊसाहेब कारेकर, प्रकाश परब, शहाजी ढेकणे, जयसिंग डुमरे, विशाल गावडे, सुधाकर तांबे, डॉ वि. बा. लागू, निवृत्ती शिंदे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते. गायिका वंदना घांगुर्डे आणि सहकाऱ्यांनी आयोजन व सादरीकरण केले. नारायणगाव, चाकण, पिंपरी, भोसरी, हिंजवडी, औंध, मुठा, पिंपरखेड, लोणावळा, फुरसुंगी, हडपसर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तांबे म्हणाले, सच्चे, संस्कारित आणि निष्ठावान व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी स्काऊट-गाईड चळवळीच्या माध्यमातून काम सुरू आहे. स्काऊट-गाईड चळवळ ही मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ असून, उत्तम पिढ्या घडविणारे विद्यापीठ आहे. (वार्ताहर)