पिंपरीतील विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमध्ये घरबसल्या मिळणार प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:53 PM2020-07-18T20:53:13+5:302020-07-18T20:54:08+5:30
विद्यार्थांनी विविध दाखले व प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे गर्दी करण्याची गरज नाही..
पिंपरी : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार पिंपरी - चिंचवड कार्यालयाने हे दाखले घरबसल्या आॅनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी आपले सरकार या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहेत.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटवर माहिती व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1 ही वेबसाईट पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. कशाप्रकारे अर्ज दाखल करावा यासाठी या वेबसाईटवर व्हिडीओ दिला आहे. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तसेच ३९ महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. अर्ज भरण्यास काही अडचण आल्यास आपल्या घराजवळील महा ई सेवा केंद्र अथवा नागरिक सुविधा केंद्रांना संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करता येणार आहेत.
विद्यार्थांनी विविध दाखले व प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे गर्दी करण्याची गरज नाही, असे तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले.
महत्त्त्वाच्या सूचना
* अर्ज इंग्रजी व मराठीतच भरावा.
* इंग्रजी व मराठीतील नाव तपासल्यानंतरच अर्ज सबमिट करावा.
* मूळ कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून पाठवणे.
* काही अडचण असल्यास अप्पर तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.
............................
हे दाखले मिळतील ऑनलाइन
* उत्पन्नाचा दाखला
* वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमासाईल)
* रहिवाशी दाखला
* जातीचा दाखला
* नॉन क्रिमिलिअर/ उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला
* ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे प्रमाणपत्र