विद्यार्थ्यांनी अभ्यासातील आनंद शोधावा : अमित नवले
By admin | Published: May 5, 2017 02:44 AM2017-05-05T02:44:23+5:302017-05-05T02:44:23+5:30
ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व त्याचबरोबर अभ्यास करताना अभ्यासातील आनंद शोधावा, तसेच जेईई व नीट यांसारख्या
पिंपरी : ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व त्याचबरोबर अभ्यास करताना अभ्यासातील आनंद शोधावा, तसेच जेईई व नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी,या आदी विषयावर सप्तर्षी क्लासेस चे संचालक अमित नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकमत व सप्तर्षी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.
नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. अकरावी सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष मार्गदर्शन वगार्चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात शिक्षण तज्ज्ञ विवेक
वेलणकर यांनी ‘१२वी सायन्सनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्राकडे अनेकांचा कल असतो. त्यातही यांमधील ठरावीक शाखांचा विचार केला जातो. परंतु करिअरचे अनेक पर्याय आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे. फिजिओथेरेपी, होमिओपॅथी, स्पीच थेरपी यांसारखे पर्याय त्यांनी सुचविले. संशोधन क्षेत्राचासुद्धा करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले. ११वी आणि १२वी या दोन वर्षांतील योग्य नियोजनावर पुढची सर्व वर्षे आणि शिक्षण अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी संख्यात्मकऐवजी गुणवत्तापूर्वक अभ्यासावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत आणि सप्तर्षी क्लासेस यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी सप्तर्षी क्लासेस या संस्थेने पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक म्हणून सिझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट होते. (प्रतिनिधी)
मार्गदर्शन वर्गाच्या दुसऱ्या सत्रात सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले यांनी जेईई व नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांंबद्दल माहिती दिली. या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी,या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी कोणत्या प्रवेश परीक्षा आहेत. त्यांचे स्वरूप कशा प्रकारचे आहे. परीक्षांची तयारी कशी करावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.