स्कुलबसमध्ये मोठ्याने गाणं लावून चालकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग; चालकाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:56 PM2022-12-09T17:56:04+5:302022-12-09T18:03:55+5:30
दोन मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनात लज्जा उत्पन होईल, असे कृत्य केले.
पिंपरी : स्कूलबसमध्ये मोठ्याने गाणे लावून तसेच स्कूलबस बंद पडली असता दोन विद्यार्थींना बस मधून उतरू न देता त्यांच्याशी गैरवर्तन करून स्कूलबस चालकाने विनयभंग केला. ही घटना मागील सहा महिन्यांपासून ते आठ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडला. या प्रकरणी पीडित विद्यार्थीने गुरुवारी (दि.८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चालक पिंकू कुमार (वय ३०) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तिची मैत्रीण स्कूलबसमधून घरी जात असताना बसचालक आरोपी रोज मोठ्याने गाणी लावून त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत होता. फिर्यादी आणि तिच्या मैत्रीणीने आरोपीला गाण्यांचा आवाज कमी करण्यास सांगितला. मात्र, आरोपीने तुम्हाला काय करायचे ते करा मी मोठ्याने गाणी लावणार असे उत्तर देत फिर्यादीकडे बघून गाणी म्हणून लागला. फिर्यादीच्या बोलण्याचा राग आल्याने आरोपी मोबाईलवर बोलत असताना त्याने मोबाईळ रागाने स्कूलबस बाहेर फेकून देत बस जोरात चालवली. पुढे बस बंद पडली म्हणून बसमधील मुले खाली उतरली मात्र, आरोपीने फिर्यादी आणि तिच्या मैत्रीणीला बसमधून उतरून दिले नाही. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रीणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनात लज्जा उत्पन होईल, असे कृत्य केले.