जाचक अटींमुळे शैक्षणिक सहलीला विद्यार्थी मुकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:53 AM2018-12-20T00:53:09+5:302018-12-20T00:53:46+5:30
शिक्षण विभागाच्या विविध अटी : एसटी महामंडळालाही आर्थिक तोटा
दावडी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीला जाणे शिक्षण विभागाच्या विविध अटीमुळे कठीण होऊन बसले आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसंदर्भात एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये नमूद असलेल्या विविध अटीची वेळीच पूर्तता करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीला जाण्यास अनेक समस्या वाढल्या असून विद्यार्थ्यांना यापुढे सहलीला जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फटका मात्र एसटी महामंडळाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नियमित शिक्षणासोबतच त्यांच्यासाठी शासन व शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक सहल त्यापैकी एक उपक्रम होय वर्षातून एकदा आयोजित केली जाणारी ही शैक्षणिक सहल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडीची असते. त्यामुळे ते सहलीच्या प्रतीक्षेत असतात. शिक्षण विभागाने अलीकडे या शैक्षणिक सहलीच्या नियमांमध्ये काही फेरबदल केले आहेत. तसा आदेश संपूर्ण शाळा व्यवस्थापनाला पाठवण्यात आला आहे. नवीन अटीनुसार शिक्षक मुलांना सहलीसाठी नेण्यास धजावत नाहीत. विनापरवानगी सहलीचे आयोजन केल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार असल्याचेही या आदेशात नमूद केले आहे. दुसरीकडे, बहुतांश शाळा शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर करतात. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्नही मिळायचे. या सहलीचे आयोजन दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात करण्याचा प्रघात आहे. नवीन अटीनुसार सहलीचे आयोजन बंद केल्यास एसटीला शाळांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे. नवीन आदेशानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची कमी काळात जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.
या आहेत नवीन अटी...
४आधी सहलीचा प्रस्ताव तयार करून त्याला शिक्षण विभागाची परवानगी घेणे, तसेच त्या प्रस्तावासोबत मुख्याध्यापकाचे हमीपत्र जोडणे अनिवार्य आहे.
शिवाय सहलीला जाणाºया विद्यार्थ्यांची यादी सहलीचे ठिकाण त्या ठिकाणाची माहिती शाळेपासून ठिकाणाचे अंतर व शिक्षण संस्था व्यवस्थापन समितीची
परवानगी विद्यार्थी व पालकांचे हमीपत्र सहलीला जाण्यासाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, संबंधित विद्यार्थ्यांचा विमा काढून त्याचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाला सादर करणे आवश्यक आहे.
एसटी महामंडळ शैक्षणिक सहलीसाठी स्वस्त दरात एसटी बसेस पुरवत असतात. तसेच काही दुदैवाने दुर्घटना घडल्यास प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा महामंडळ देते. प्रशिक्षित चालक, सुरक्षित प्रवास एसटीचा असतो. खेड तालुका व आंबेगाव तालुक्याचा काही भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे दर वर्षाला २५० प्रांसगिक करार होतात. यंदा मात्र आतापर्यंत शासनाच्या किचकट अटीमुळे फक्त १० शाळेचे प्रांसगिक करार झाले आहेत. त्यामुळे यंदा बसेस बुक झाल्या नाहीत. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा होणार असल्याचे राजगुरुनगर आगार व्यवस्थापनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
४विद्यार्थ्यांना ऐतिहासिक किल्ले, भौगलिक परिसर, कोकणचा समुद्र, मनोरंजन स्थळे, बागबगीचे, प्राचीन देवस्थान, लेण्या, थंड हवेची ठिकाणे, सायन्स पार्क इत्यादी ठिकाणांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात.
४मात्र शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे विद्यार्थ्यांना यापुढे शैक्षणिक सहलीला मुकावे लागणार आहे.
४शिक्षण विभागाने ह्या अटी शिथिल कराव्या, असे मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.