संतपीठासाठी ‘अभ्यास’वारी
By admin | Published: May 9, 2017 03:53 AM2017-05-09T03:53:34+5:302017-05-09T03:53:34+5:30
संतपीठाचा आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्मयाची रचना आदींची
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संतपीठाचा आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्मयाची रचना आदींची माहिती मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे अभ्यासदौरा होणार आहे. दिल्ली, हरिद्वारपासून कटक, ओडिसापर्यंत आयोजित या विविध पीठ अभ्यासवारीत आमदार, अतिरिक्त आयुक्तांसह अनेक अभ्यासक सहभागी होणार आहेत.
भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, अन्य वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमाणसांना मिळावे, म्हणून महापालिका राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ टाळगाव-चिखलीत उभारणार आहे. संतपीठाला १३ मे २०१५ रोजीच्या महापालिका सभेत मान्यता दिली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक १६५३ मधील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी-शर्तींवर या जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश जारी केला. जमीन ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संतपीठामध्ये निवासी स्वरूपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथे सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. समितीही नेमली असून, त्यामध्ये डॉ. सदानंद मोरे, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थानाचे विश्वस्त अभय टिळक, हभप दिनकरशास्त्री भुकेले यांचा समावेश आहे.