Video: धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त
By प्रकाश गायकर | Published: February 16, 2024 05:19 PM2024-02-16T17:19:19+5:302024-02-16T17:20:32+5:30
काहीही केले तरी चालेल, कोणी काहीच करत नाही, काहीच होत नाही, असा विचार करू नका - पोलिसांचा नियम न पाळणाऱ्यांना सज्जड दम
पिंपरी : भरधाव कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने या तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्याची कार जप्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. प्रतिक सुशील शिंगटे (२४, रा. कृष्णानगर, निगडी) आणि ओमकार कृष्णा मुंढे (२०, रा. निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरिक्षक योगेश सुरेश गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक शिंगटे हा वडापाव सेंटर चालवतो. तर, ओमकार मुंढे हा निगडी पोलिस लाईनमध्ये राहत आहे. हे दोघेही गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये चारचाकी वाहन भरधाव चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे हा कार चालवत होता. मुंढे हा कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता. संपूर्ण रस्त्यावर वेगाने कार चालवत हे दोघेही स्टंटबाजी करत होते. त्यामुळे रस्त्यावरील इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी परस्थिती निर्माण झाली होती. या दोघांनी केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर पोलिसांनी तातडीने या दोन्ही तरुणांना अटक केली. त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे.
रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. दुचाकी, चारचाकी चालविताना स्टंटबाजी करणे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. या प्रकारामुळे स्वत:सह दुसऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. - वसंत परदेशी, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पिंपरी - चिंचवड पोलिस
धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त#pimprichinchwad#stunt#car#Policepic.twitter.com/0avJ1H186D
— Lokmat (@lokmat) February 16, 2024
स्टंटबाजीचे बक्षीस म्हणत सज्जड दम...
कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकाराची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवर ट्विट केली आहे. स्टंटटबाजीचा व्हिडीओ आणि कारवाईनंतरचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तसेच आपण काहीही केले तरी चालेल, कोणी काहीच करत नाही, काहीच होत नाही, असा विचार करू नका. तुमच्या स्टंटबाजीचे बक्षीस नक्कीच मिळेल, असा सज्जड दमच पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना दिला आहे.