शिक्षक सेवावर्गीकरणाचा विषय आयत्या वेळी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:01 PM2018-10-04T23:01:43+5:302018-10-04T23:02:12+5:30
शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. भरतीच्या प्रस्तावाची फाईल सभापतींकडे कशी आली?
पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण समितीची बैठक आज झाली. त्यात १३१ पैकी ५१ शिक्षक सेवा वर्गीकरणाचा विषय आयत्या वेळी मंजूर करण्यात आला. हा विषय सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘‘शिक्षक भरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल सात लाखांचा भाव फुटला आहे. यामध्ये साडेतीन कोटींची उलाढाल होणार असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीने केला आहे. आरोपात तथ्य नसल्याचे शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी सांगितले.
शिक्षण समितीची सभा झाली. या वेळी भाजपाच्या शर्मिला बाबर, सुवर्णा बुर्डे, संगीता भोंडवे, शारदा सोनवणे, शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे उपस्थित होते. विषयपत्रिकेवर पाच विषय होते, तर तीन विषय आयत्या वेळी मंजूर करण्यात आले. समितीच्या सभेत आयत्या वेळी सेवा वर्गीकरण, शाळानिहाय सायन्स सेंटर उभारणे, शाळांमध्ये ग्रीन बोर्ड बसविण्यासाठी रक्कम वर्गीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला. सेवा वर्गीकरणाच्या विषयाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याचा विषय होता.
शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. भरतीच्या प्रस्तावाची फाईल सभापतींकडे कशी आली?’’ राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, ‘‘हा प्रस्ताव सदस्यांमार्फत मांडला आहे. शिक्षक टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे. तसेच शिक्षणाधिकारी रजेवर असून, त्यांची घरी जाऊन स्वाक्षरी घेतली.’’