उपसूचनांवर एकमत नसल्याने सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:22 AM2018-03-10T05:22:42+5:302018-03-10T05:22:42+5:30
पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील विशेष सर्वसाधारण सभा दुसºयांदा तहकूब केली आहे. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचे कारण देण्यात आले. मात्र, अर्थसंकल्पावरील काही उपसूचनांवर एकमत न झाल्याने सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, अवघ्या दोन तासांतच अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा सभापती सीमा सावळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला आहे.
भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होऊ न देता अवघ्या दहा मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केला होता. ही परंपरा कायम ठेवणार, की सदस्यांना त्यावर बोलू देणार, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा होती. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आज अर्थसंकल्पावरील सभा दुसºयांदा तहकूब केली.
सुरुवातीलाच सुजाता पालांडे यांनी महापौरांना सभागृहाच्या वतीने शुभेच्छा देण्याची सूचना मांडली. त्यानंतर नामदेव ढाके यांनी माजी नगरसेविका डॉ. कमरुनिस्सा खान, अभिनेत्री शम्मी रबाडी, शिक्षक विनायक राऊत यांच्यासह विविध क्षेत्रांतील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली.
सभा शास्त्राचे संकेत धुळीस
विशेष महासभेत सभाशास्त्राचे संकेत पायदळी तुडविले. एकाच सभेत अगोदर महापौरांना पदाधिकाºयांनी आणि गटनेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर, त्यानंतर दिवंगत माजी नगरसेविकेला श्रद्धांजली वाहिली. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहिल्याने सभाशास्त्राचे संकेत धुळीस मिळविल्याचे जाणकारांचे मत आहे.