ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:16 AM2019-07-28T11:16:35+5:302019-07-28T11:17:31+5:30
मळवली येथील ओशाे नावाच्या आश्रमात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात पाेलीस आणि गावकऱ्यांना यश आले आहे.
लोणावळा : मळवली जवळच्या देवले भाजे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या ओशाे नावाच्या आश्रमात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. यात लहान मुले व वयाेवृद्धांचा देखील समावेश हाेता.
मळवली नजिकच्या देवले भाजे गावच्या हद्दिमध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्यामुळे नदीलगतचे बंगले, घरे, प्लॉट पाण्याने भरले आहेत. ओशो नावाच्या एका आश्रम मध्ये 30 ते 40 पर्यटक अडकले होते, त्यामध्ये काही लहान मुले व वयोवृध्दांचा देखिल समावेश होता. आश्रमातील एका कामगारांने लोणावळा ग्रामीण पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व शिवदुर्गची टिम देवले गावात दाखल झाली व दुपारी एक वाजल्यापासून या पर्यटकांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. अथक प्रयत्नानंतर चार वाजण्याच्या सुमारास सर्व पर्यटकांना बोट व रोपच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुराचे पाणी सर्वत्र पसरले असल्याने तसेच काही रस्ते पाण्याखाली असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पर्यटकांनी देखिल आपत्कालिन स्थितीची माहिती घेत बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.