पिंपरीत मेट्रोचा सहा किलोमीटर यशस्वी ट्रायल रन, पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर चाचणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:21 PM2021-01-03T19:21:32+5:302021-01-03T19:22:32+5:30
Pimpari Metro News : पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत.
पिंपरी - महामेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. त्यात पिंपरी ते स्वारगेट हा प्राधान्यक्रम मार्ग आहे. या मागार्वरील पिंपरी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले. या मार्गावर रविवारी (दि. ३) दुपारी दीडला पिंपरी येथून मेट्रो सुटून दोनला फुगेवाडी येथे पोहचून हा ट्रायल रन यशस्वी झाला.
पुणे मेट्रोचे आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी पिंपरी महापालिका ते संत तुकारामनगर या एक किलोमीटर मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षांनी रविवारी ही दुसरी चाचणी घेण्यात आली.
पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा यांनी मेट्रोच्या चाचणीसाठी परिश्रम केले. तीन कोच असलेली ही मेट्रो ट्रेन ऑपरेटर चेतन फडके यांनी चालविली.
पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन, कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असुन चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. रविवारी घेण्यात आलेली चाचणी ही पुणे मेट्रोच्या कामामधला एक महत्वाचा टप्पा आहे.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो