पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेच्या पोटातून काढली कॅन्सरची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:47 AM2022-11-17T09:47:23+5:302022-11-17T09:47:41+5:30

नाणेकरवाडी, चाकण येथील सत्तरीतील भीमाबाई अढाळ या गेल्या २ वर्षांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त होत्या

Successful surgery at YCM Hospital, Pimpri Cancer removed from stomach of 70-year-old woman | पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेच्या पोटातून काढली कॅन्सरची गाठ

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext

पिंपरी : वायसीएम रुग्णालयात महिलेच्या पोटातून ५ किलोची ‘‘कॅन्सर’’ची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात आली. नाणेकरवाडी, चाकण येथील सत्तरीतील भीमाबाई अढाळ या गेल्या २ वर्षांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या पोटात सतत दुखणे, जेवल्यानंतर उलटी होण्याचा त्रास, तसेच वजन कमी होत होते. त्यांनी वेळोवेळी स्थानिक रुग्णालयात दाखवले. परंतु, त्यांना त्रासातून सुटका मिळत नव्हती. पुण्यामध्ये त्यांना खासगी रुग्णालयामध्ये होणारे खर्च झेपणारे नव्हते. त्यांच्या नातेवाईकांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखवले.

ही जटील शस्त्रक्रिया असल्याने पदव्युत्तर संस्था विभागाच्या सर्जरी पथकाने संपूर्ण तपासणी करून त्यांना ॲडमिट करून घेतले. आवश्यक असणाऱ्या पोटाच्या सिटी स्कॅन, सोनोग्राफी, वेगवेगळे ट्युमर मार्कर इत्यादी करून झाल्यावर रेट्रोपेरिटोनियल सारकोमाचे निदान करण्यात आले. रुग्णाचे वय व खालावत असलेली तब्येत पाहता त्यांना ऑपरेशनपूर्वी वेगवेगळी औषधे सुरू करण्यात आली. त्यासोबतच फिजिओथेरपी देण्यात आली. ऑपरेशनपूर्वी नातेवाइकांना आजाराची पूर्ण माहिती देऊन संभाव्य धोक्याबदल सांगण्यात आले. नातेवाइकांच्या परवानगीने रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. बालाजी धायगुडे, डॉ. आनंद शिंगाडे, डॉ. जितेंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी पथकातील डॉ. मयुर बावीस्कर, डॉ. दीक्षा कटारे, डॉ. सौरभ सिंग, डॉ. अजिंक्य, डॉ. स्पर्श व सिस्टर इन्चार्ज ओटी स्वाती कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.

''सर्जरीदरम्यान पोटामधील दोन मोठ्या गाठी काढण्यात आल्या. या कॅन्सरच्या गाठी पोटामध्ये किडनी व मोठ्या आतड्यांना प्रेशर देऊन त्यांच्या कामात अडथळा करत होत्या. ज्यामुळे डाव्या किडनीला सूज आली होती. त्यासोबतच कॅन्सर पोटाच्या मोठ्या रक्त वाहिन्यांपर्यंत पोहचला होता. -  डॉ. संतोष थोरात, सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर विभाग, वायसीएमएच''

"रेट्रोपेरीटोनियल सारकोमा" हे दुर्मीळ प्रकारचे कॅन्सर असतात, एकूण घन अवयवांच्या १-२ टक्के इतक्या प्रमाणात आढळतात. पूर्णपणे गाठ काढणे, हाच त्यावर संपूर्ण इलाज असतो. वायसीएमएचमध्ये पीजीआयच्या माध्यामातून व अद्ययावत यंत्रणेच्या साहाय्याने जटील व पूर्वी न होणाऱ्या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहेत. +८- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएमएच''

Web Title: Successful surgery at YCM Hospital, Pimpri Cancer removed from stomach of 70-year-old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.