पिंपरी परिसरात कडकडीत बंद , पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:11 PM2018-08-09T14:11:20+5:302018-08-09T14:18:30+5:30
सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
पिंपरी चिंचवड: सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र दिसून आले. मोशी , कामशेत, रहाटणी, रावेत, पिंपळे सौदागर, लोणावळा भागात कडकडीत बंद पाळला गेला. पीएमपी बससेवा, एसटी बस, रिक्षा आदी वाहतूकीची साधने बंद असल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. या आंदोलना दरम्यान सर्व मराठा समाजातील तरुणांनी रस्त्यावर दुचाकी रॅली, घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन,रेल्वे रोको असे विविधप्रकारे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुणे- मुंबई दु्रतगती मार्गावर देखील वाहतूक ठप्प झाली.
मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ,मोशी टोल नाका ,देहू फाटा चौक ,जय गणेश साम्राज्य चौक आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यावसायिकांनी दुकाने दिवसभर बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.बंद मधून अत्यावशक सेवा वगळण्यात आला होत्या. पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांची वर्दळ तुरळक दिसून येत होती. रस्ता दिवसभर रिकामा दिसून येत होता.
मोशीतील तरुणांनी दुचाकी रॅली काढत हातात भगवे ध्वज घेत बंद मध्ये सहभाग नोंदवला. काही तरुणांनी पायी रॅली काढली असून घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. परिसरातील भाजी मंडई, व्यापारी गाळे,हॉटले,टोल नाका, देहू रस्ता चौक,जय गणेश साम्राज्य चौक,नवीन देहू आळंदी रस्ता,शिवाजी वाडी,इंद्रायणी पार्क,लक्ष्मी नगर,दक्षिण उत्तर,नागेश्वर नगर, आदर्श नगर,खान्देश नगर,संत नगरमध्ये देखील शुकशुकाट दिसत होता .
कामशेतमध्ये शुकशुकाट, महामार्ग पडला ओस
शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद असून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर जुना मुंबई- पुणे महामार्गावर एकही वाहन नसल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. महत्वाच्या ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्तात मराठा क्रांती मोर्चा शांततेत सुरु झाला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर नाणे, पवन, आंदर मावळातील महत्वाची कामशेत बाजारपेठ पूर्णत: बंद होती. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. शहर व आजूबाजूच्या शाळांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर महामार्गावर व द्रुतगती मार्गावरील वाहने पोलीस यंत्रणेने कडक बंदोबस्त तैनात ठेवला होता.
...........................
रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात शांततामय वातावरणात बंद सुरू
मराठा आरक्षणाच्या समानार्थ सकल मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला रहटणी ,काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, अगदी सकाळपासूनच परिसरातील सर्वच व्यापा?्यांनी स्फूर्त पणे आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत मात्र रुग्णालय, मेडिकल ,बँका, पीएमपीएल बसेस व रिक्षा सुरू होत्या त्यामुळे परिसरांमध्ये शांततामय वातावरणात बंद सुरू आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.
.........................
रावेत परिसरात दुचाकी रॅली
रावेत, किवळे, वाल्हेकर वाडी परिसरात कडकडीत बंद सुरू आहे ,रावेत परिसरात सकल मराठा मोर्चा आंदोलकांनी दुचाकी रॅली काढून घोषणा देत रावेत परिसर दणाणून सोडला. रावेत प्राधिकरण,भोंडवे कॉर्नर, रावेत गावठाण, मुकाई चौक, बीआरटी मार्गावरून निघत रॅलीची सांगता संत तुकाराम पुलाजवळील बीआरटी चौकात करण्यात आली. यांनंतर या चौकात जवळपास एक तास झाले आंदोलकांचे शांततेत ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिसरातील सर्व दुकाने व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले आहेत.सकाळ पासून शहर वाहतूक व्यवस्थेच्या पीएमपीएल बस बंद ठेवण्यात आली आहे. देहूरोड पोलिसांनी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.परिसरातील अत्यावश्यक सेवा असणारे दवाखाने,मेडिकल दुकाने, बँका सुरू आहेत, शांततापूर्ण जनजीवन सुरळीत सुरू आहे.
......................