विकेंड लॉकडाऊन अचानक रद्द झाल्याने पिंपरीत भाज्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 02:30 PM2021-05-30T14:30:34+5:302021-05-30T14:31:00+5:30
मंडईत आज भाज्यांची आवक झाली कमी, ग्राहकांच्या खिशाला बसली झळ
पिंपरी: विकेंड लाॅकडाऊन रद्द करण्यात आल्याने दिलासा मिळाला असला तरी त्याबाबतचा निर्णय अचानक घेण्यात आल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला त्याची झळ बसली. तसेच मालाची पुरेपूर आवक होण्यातही अडचणी आल्या. परिणामी श्रावणी घेवडा, मटार, कारली आदी फळभाज्या बाजारात दाखल झाल्या नाहीत.
विकेंड लॉकडाऊन रद्द केल्याबाबत लवकर माहिती न मिळाल्याने बहुतांश व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवणे पसंत केले. त्यामुळे पिंपरी येथील भाजी मंडईत रविवारी केवळ ३० टक्के दुकाने सुरू होती. तसेच मालाची आवक कमी झाली. त्यामुळे ग्राहक असूनही पुरेसा माल उपलब्ध नव्हता. पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आवक कमी झाली. त्यातच अचानक मंडई सुरू झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे प्रतिगड्डी १० ते १२ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत पालेभाज्यांचे दर वाढले.
विकेंड लॉकडाऊनमुळे स्थानिक शेतकरी शुक्रवारी व शनिवारी भाजीपाला काढत नाहीत. या आठवड्यातही त्यांनी या दोन दिवसांत भाजीपाला काढला नाही. परिणामी मालाची आवक न झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला. मात्र सोमवारपासून मालाची आवक होऊन दर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यावसायिक व ग्राहकांनी व्यक्त केला आहे.
विक्रेते आबा रायकर म्हणाले, विकेंड लॉकडाऊन रद्द झाल्याबाबत उशिरा माहिती मिळाली. त्यामुळे मालखरेदीचे नियोजन करणे शक्य झाले नाही. तसेच काही व्यावसायिक संभ्रमात आहेत. परिणामी रविवारी पूर्ण क्षमतेने मंडईतील दुकाने सुरू झाली नाहीत. तसेच मालाची आवक कमी झाल्याने दर वाढले.
नवीन निर्णयामुळे शनिवारी व रविवारीही ताजा भाजीपाला खरेदी करता येणार आहे. मात्र या आठवड्यात दर दुपटीने वाढल्याने आवश्यक भाज्यांचीच खरेदी केली. पालेभाज्यांचे दर आवाक्यात आले पाहिजेत. असे ग्राहक संगीता कांबळे यांनी सांगितले.