पदमजी पेपर मिलजवळ चेंबरला लागली अचानक आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:18 AM2019-02-23T02:18:12+5:302019-02-23T02:18:35+5:30
थेरगाव : तरुणांच्या तत्परतेने अनर्थ टळला
थेरगाव : दत्तनगर येथील पदमजी पेपर मिलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत चेंबरला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे काही वेळ परिसर धूरमय झाला होता. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिलच्या बाजूने डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी चेंबर बांधण्यात आलेले आहेत. ते सिमेंटचे ब्लॉक टाकून झाकण्यात आलेले आहेत. गुरुवारी रात्री अचानक सिमेंटच्या ब्लॉकमध्ये असलेल्या फटींमधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या व परिसरात धूर पसरला.
आग लागल्याचे समजताच लवकुश मित्र मंडळाचे संचालक जयपाल गायकवाड घटनास्थळी पोहोचले. सोबत थेरगाव फाउंडेशनचे सदस्य अनिल घोडेकर, युवराज पाटील व अनिकेत प्रभू यांनीदेखील धाव घेतली. त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती कळवली. अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत लवकुश मित्र मंडळ, बजरंग दल व पदमजी पेपर मिलच्या सुरक्षारक्षकांनी आगीवर माती टाकून ती विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. चेंबरवर पदमजी पेपर मिलमधील कर्मचारी आपल्या दुचाकी र्पाकिंग करीत असतात. तसेच कागदाने भरलेले ट्रक या ठिकाणी उभे केले जातात. आग पसरली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. थेरगावमधील तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.