"अचानकसे बडा धमाका हुआ और..."; कामगारातील मजूर सांगतोय कहाणी
By नारायण बडगुजर | Published: December 8, 2023 11:46 PM2023-12-08T23:46:37+5:302023-12-08T23:50:19+5:30
तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले.
पिंपरी : ‘‘मै अपना फेब्रिकेशनका काम कर रहा था, तब अचानक बडा धमाका हुआ. पुरा बदन हिल गया. देखा तो पटाखेके कारखानेमें मजदुरोंका बडा हंगामा सुनाई दिया और सरसे पांव तक पुरा बदन कांपने लगा...’’, ही ‘आंखो देखी’ आहे फॅब्रिकेशनच्या कारखान्यातील बबलू वर्मा या मजुराची.
तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. बबलू वर्मा या मजुराने स्फोटानंतरच्या घटना प्रत्यक्ष पाहिल्या. उत्तर भारतीय असलेला बबलू दोन दिवसांपूर्वीच ज्योतिबानगर येथील राणा इंजिनियरिंग या फॅब्रिकेशन कारखान्यात मजूर म्हणून कामासाठी आला. शुक्रवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे लोखंडी प्लेट कापण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याच्यापासून केवळ ५० फूट अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला.
बबलू वर्मा म्हणाला, ‘अचानक से ये क्या हुआ ये कुछभी समझ नहीं आ रहा था तभी कुछ महिलाए चिल्लाती-चिखती हुई कारखानेसे बाहर निकलने की कोशीश कर रही थी. तब कारखानेमे बहुत धुंवा दिखाई दिया. धुएंमेसे कुछ महिलाए बाहर आयी. तब वह जख्मी थी. धमाका इतना बडा था की मै सुन्न हो गया. मुझे कुछ सुझही नहीं रहा था. मै खुद को संभालनेकी कोशीश कर रहा था.’
वाचवा, वाचवाऽऽ आग लागली -
कारखान्यात स्फोट झाल्यानंतर महिलांचा एकच गलका झाला. ‘वाचवा, वाचवाऽऽ आग लागली’, असे म्हणत महिलांची धडपड सुरू झाली. दरम्यान कारखाना चालक शरद सुतार हाही जखमी झालेल्या अवस्थेत कारखान्यातून बाहेर पडला. मुख्य रस्त्याकडे धावत आला. आग लागली आहे, असे तो ओरडून सांगत होता. त्यावेळी त्याला काही नागरिकांनी शांत केले. त्याच्या पाठोपाठ आलेल्या जखमी महिलांनाही चारचाकी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मजुरांची धावपळ
फटाका कारखान्याला लागून इतरही कारखाने आहेत. या कारखान्यांमध्येही नियमित कामकाज सुरू होते. स्फोटाच्या आवाजाने या कारखान्यांतील इतर मजुरांचीही भंबेरी उडाली. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी त्यांनी कारखान्याकडे धाव घेतली. त्यावेळी दुर्घटना पाहून त्यांचेही अवसान गळाले.