सुधा पूल : शंभरी पार करुनही वाहतूक सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:17 AM2018-01-03T03:17:50+5:302018-01-03T03:17:56+5:30
तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
देहूगाव - तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाची स्थिती धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पुलावर, तसेच जवळच अनेक अपघात झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेतल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक करीत आहेत.
प्रामुख्याने खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतून शेतीची उत्पादने व भाजीपाला (तरकारी) मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. या परिसरातील भाजीपाला व धान्य पूर्वी तळेगाव, चिंचवड व देहूरोड रेल्वे स्टेशनकडे बैलगाडीच्या मदतीने आणला जात होता. मात्र, रस्त्यात नद्यांचे अडथळे येत होते. यापैकी देहूरोड व तळेगाव रेल्वे स्टेशनला जोडणाºया या तळेगाव-चाकण रस्त्यावर १९१२ मध्ये सुधा नदीवर पूल बांधण्यात आला. पुलामुळे पावसाळ्यातही मालाची वाहतूक सहज आणि वेगाने होऊ लागली. सध्या तळेगाव-चाकण हा रस्ता अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा जुना व महत्त्वाचा राज्य मार्ग आहे.
औद्योगिकीकरणामुळे याच रस्त्याकडेच्या खालुंब्रे, म्हाळुंगे (इंगळे), खराबबाडी, नाणेकरवाडी अशा गावांचा विकास झाला. याच रस्त्याला जोडणाºया आंबेठाण, शिंदे, वासुली, सुदुंबरे ही गावेही विकसित होत आहेत. परिणामी कामगार व
वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या सुरुवातीला देहूफाटा, तळेगाव व चाकणच्या बाजू अशा दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच पुलाला समांतर पूल उभारण्यात आला आहे. त्याच्याही सुरुवातीला हे खड्डे पाहायला मिळतात. हे खड्डे इतके मोठे आहेत, की कोणतेही वाहन सहज उलटू शकते.
वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीत जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. तळेगावकडून चाकणकडे जाताना तर सुधा नदीच्या पुलाच्या मध्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हा पूल धोकादायक झाला आहे.
हा पूल १०० वर्षांचा झाला असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक होऊ शकतो, असे पत्रही मागे ब्रिटिश सरकारने पाठविले होते. या पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटलेले आहेत. प्रवेश करतानाच वळण असल्याने वाहने वेगाने येत असतात. अपघात झाल्यास या भागात वाहने थेट नदीपात्रात जातात. पुलाच्या खालील बाजूला दगडी भिंतीवर पिंपळाची झाडे उगवली असून, झाडांची मुळे भिंतीत गेली आहेत. यामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महाडसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत काय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.